Advertisement
विशेष सरकारील वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात अर्ज
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. या हत्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली असून आता पुढील सुनावणी ही 24 तारखेला होणार आहे. आजच्या सुनावणीनंतर या केसमधील विशेष सरकारील वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात केल्याचे त्यांनी नमूद केलं. आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यात यावी असा अर्ज आम्ही न्यायालयात दिला असून त्यावर वाल्मिकतर्फे कोणताही खुलासा दाखल करण्यात आलेला नाही. त्यावर पुढे रीतसर सुनावणी होईल. त्यामुळे आता वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होते का, कोर्ट काय आदेश देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज न्यायालयामध्ये आम्ही जी कागदपत्र सादर केली, त्यातील प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ, तो आरोपींनीच काढला होता असं सीआयडीच्या तपासात दिसून आलं होतं. आणि तो सीलबंद परिस्थितीत, फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला होता. तो संपूर्ण व्हिडीओ आम्ही न्यायलयात हजर केला , पण या व्हिडीओला कोणत्याही प्रकारे बाहेर प्रसिद्धी मिळू नये अशी विनंती आम्ही न्यायालयाकडे केली आहे. तो बाहेर आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला ही विनंती केली आहे. त्यावर न्यायालयाने सर्व आरोपींचं म्हणणं मागितलं आहे. आणि त्यांचं म्हणणं हे 24 तारखेला न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, तेव्हा यासंबंधी सुनावणी होईल, असे निकम यांनी सांगितलं.
