Advertisement
पुणे : पुण्यातील रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नावर अजित पवारांनी, "नो कमेंट्स" अशी प्रतिक्रिया नोंदवताना थेट भाष्य करणं टाळलं. मात्र त्यावेळेस पुढे बोलताना अजित पवारांनी, हा रस्ता अवघा 600 मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर खासदार निधीतून तो रस्ता करता येऊ शकतो, असं म्हणत सुप्रिया सुळेंना अप्रत्यक्षपणे टोला लागवला.
पिंपरीमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कारासाठी ते आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. मी 35 वर्षे काम करतोय. 600 मीटरच्या रस्त्याकरता? आमदार अन खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो. काम करायचं म्हटलं तर एका मिनिटांत करता आलं असतं, असं सूचक विधान केले. तो रस्ता फक्त 600 मीटरचा रस्ता आहे. देवगिरी बंगल्यावर मंगळवारी बैठक होते. त्यावेळी शंकर मांडेकरने माझ्याकडे हा विषय मांडला. अवघ्या 600 मीटरच्या रस्त्याबाबत हे सुरु आहे. मांडेकर स्थानिक आमदार आहे, मी त्याला सांगितलं आहे. मुळात मागच्या आमदाराने त्याकडे लक्ष दिलं नाही. मी त्याला निधी देऊन, लवकरच काम सुरू करतो. हे मी कालच सांगितलं होतं. 2 तारखेला नव्हे तर ताबडतोब काम सुरू करतोय अन तो मी पूर्ण करेन, असं अजित पवार म्हणाले.
