Advertisement
मुंबई : भारताची आर्थिक राजधानी मुंबईत जमीनीचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईतील जमिनीचा मोठा भाग काही जमीनदार आणि खासगी ट्रस्टच्या मालकीचा असल्याचे एका अहवालातुन समोर आले आहे, मुंबईतील 10% पेक्षा जास्त जमीन काही खास जमीन मालकांच्या मालकीची आहे. यापैकी बऱ्याच जमीन मालकांकडे पिढ्यानपिढ्या आलेल्या जमिनी आहेत. या जमीनी कौटुंबिक मालमत्ता तसेच वारशाने मिळालेल्या आहे. तर काही सरकारने वेळोवेळी अधिग्रहित केल्या आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) एक सर्व्हे केला होता. या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील एकूण जमिनीपैकी सुमारे 20% जमीन काही विशिष्ट जमीन मालकांच्या मालकीच्या आहेत. या सर्वेक्षणानुसार, मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये 1 लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहेत. त्यापैकी 34,000 एकर जमीन राहण्यायोग्य आहे. या 34,000 एकरांपैकी सुमारे 20% जमीनीची मालकी ही 9 खाजगी संस्था, कुटुंबे आणि काही खाजगी ट्रस्ट यांच्याकडे आहे. या 20 टक्क्यांपैकी निम्म्याहून अधिक जमीन मुंबईतील विक्रोळी भागातील गोदरेज कुटुंबाची आहे.
मुंबईचे हे आहेत जमीन मालक
गोदरेज परिवार मुंबईतील सर्वात मोठा जमीनदार असल्याचे समजते. गोदरेज प्रॉपर्टीजच्या नावावर विक्रोळी परिसरात 3,400 एकरपेक्षा जास्त जमीन आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) लगत हा जमीनीचा मोठा तुकडा आहे. जमीनीच्या मालकीच्या बाबतीत FE दिनशॉ ट्रस्ट दुसऱ्या स्थानी आहे. FE दिनशॉ ट्रस्ट मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाची जमीन मालक आहे. दिनशॉ ट्रस्टच्या नानावर 683 एकर जमीन आहे. मालाड आणि आसपासच्या परिसरात FE दिनशॉ ट्रस्टची जमीन आहे. प्रतापसिंह वल्लभदास सुर्जी यांचे कुटुंब मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जमीन मालक आहेत. मुंबईतील भांडुप परिसरात आणि आसपासच्या परिसरात त्यांच्या नावावर 647 एकर जमीन आहे. जीजीभॉय अर्देशीर ट्रस्ट चौथ्या स्थानी आहे. यांच्या नावे मुंबईच्या चेंबूर परिसरात 508 एकर जमीन आहे. ए.एच. वाडिया ट्रस्ट यांच्या नावे कुर्ला परिसरात 361 एकर जमीन आहे. बायरामजी जीजीभॉय ट्रस्टच्या नावावर मुंबईच्या विविध भागात 269 एकर जमीन आहे. सर बायरामजी जीजीभॉय यांना 1830 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून 12,000 एकर जमीन मिळाली होती.