Advertisement
सांगली : शक्तिपीठ महामार्ग आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या मध्ये सांगलीत तू-तू-मै-मै चा प्रकार घडला आहे. शक्तीपिठाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली. मात्र चंद्रकांत पाटलांनी बसून नाही उभं राहूनच चर्चा होणार अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांनी शांततेचं बोला असा दम देखील आंदोलकांना भरला. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.
संतप्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रकांत पाटलांचा ताफा जात असताना जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं. यादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यावेळी म्हणाले की, सांगलीमधील बाधित शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे. इतकं असूनही आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील फक्त 5 लोकांचा विरोध आहे असं म्हणत आहेत. बाकी शेपाचशे लोकांचं समर्थन आहे असा दावा करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू का दिसत नाही हा बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.