Advertisement
संजय राऊतांच्या विधानाने उत्सुकता वाढली
मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एका पॉडकास्टमधून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही जाहीर कार्यक्रमातून सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर राज्याच्या राजकारणात मनोमिलनाच्या चर्चांना वेग आला. परदेशातून आल्यानंतर राज ठाकरे यावर बोलतील असं मनेसकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळं राज ठाकरे परतल्यामुळे आता हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगून संजय राऊतांनी उत्सुकता वाढवली आहे.
लोकसभा आणि विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास बीएमसी निवडणुकीत चित्र वेगळं दिसू शकतं, असंही बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनीही या युतीच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही. मात्र यावेळी चर्चेचा सूर कधी नव्हे इतका सकारात्मक दिसतोय. दोन्ही बाजूनं युतीसाठी पावलं टाकली जात आहेत. त्यामुळे ही केवळ चर्चाच न राहता युतीबाबत ठोस पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे.