Advertisement
दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांचे प्रतिपादन
मंगळवेढा : राजकारणात अनेक पदे मिळवत असताना माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनी नेहमीच समाजकारणाला महत्त्व दिले. ढोबळे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील काम वाढवले. त्यांच्यामुळेच आज गोरगरीब घरातील अनेक विद्यार्थी शिकून मोठे झाले. शाहू शिक्षण संस्था परिवार हजारो लोकांचा झाला. लक्ष्मणराव ढोबळे यांचे शैक्षणिक कार्य गोरगरिबांना न्याय देणारे ठरले, असे प्रतिपादन दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.
माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या वाढदिवस अभीष्टचिंतन शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दामाजीचे संचालक बसवराज पाटील, ऑल्म्पीक संघटनेचे सदस्य अजय साळुंखे, औदुंबर वाडदेकर, भारत पाटील, डॉ. सुभाष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, माजी मंत्री ढोबळे यांचा राजकीय पिंड नव्हता. गरीब कुटुंबात जन्म झाल्यानंतरही प्रचंड इच्छाशक्ती आणि कष्टाच्या बळावर शिक्षण घेतले आणि त्यानंतर राजकारणात आपले अस्तित्व दाखवून दिले. ग्रामीण भागात आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवून त्यांना ताकद दिली. शिक्षण क्षेत्रात भरीव काम केल्यामुळे ग्रामीण भागातील मुली शिकू लागल्या. शिक्षण व समाजकारणात त्यांनी योगदान दिले.
माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे काम केल्यामुळे शिक्षण संस्थेचा २८ जिल्ह्यांमध्ये विस्तार झाला. ९० तालुक्यांमध्ये गोरगरिबांची ६० हजार मुले शिकू लागली. राज्यात गरीब कुटुंबातील मुलाला न्याय देणारी संस्था म्हणून शाहू शिक्षण संस्थेची ओळख निर्माण झाली. बदललेले तंत्र विचारात घेता संस्थेने देखील त्या पद्धतीने बदल सुरू केले. सध्या व देशासाठी अनेक शूरवीरांनी मातृभूमीसाठी दिलेल्या बलिदानात बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाढदिवसावर खर्च न करता शैक्षणिक साहित्य जमा करण्याबाबत केलेल्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य गोरगरीब मुलांना देऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्यात येणार आहे.
यानिमित्त आयोजीत सायंकाळच्या सत्रात दिगंबर भगरे व लहू ढगे प्रायोजित सूर संगम प्रस्तुत देशभक्तिपर व भावगीताचा ट्रॅक शो झाला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमल साळुंखे, सचिव सिद्राम जावीर, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, ऑल्म्पीक संघटनेचे सदस्य अजय साळुंखे, चिदानंद माळी, दादासाहेब वाघमारे, बसवराज कोरे, प्रकाश खंदारे, समाधान वाघमारे, जनार्दन अवघडे आदींसह शाहू परिवार व बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन चिदानंद माळी यांनी केले.
दरवर्षी १८ में या माइया वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते पादाधिकारी व विविध क्षेत्रातील मामावर भेटवस्तू घेऊन येतात आणि वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. भारत-पाकिस्तान युद्धस्थितीमुळे देशात गंभीर वातावरण आहे. आपल्या अनेक शूर जवानांनी मातृभूमीसाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यावर्षी कोणतीही भेटवस्तू, हार, बुके न आणता, त्याऐवजी शालेय साहित्य (वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल इ.) आणावे. जे आम्ही गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करता, येईल, असे आवाहन केले होते, त्यास कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांनी आभार मानले.