Advertisement
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना अखेर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून पहाटेच्या सुमारास अटक केली. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबानं सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप केलेत. या प्रकरणात आधीच वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक झाली होती. दरम्यान, राजेंद्रला अटक केल्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांना धक्का बसला आहे.
राजेंद्र आणि सुशील सात दिवस फरार होते. अटकेपूर्वी ते एका हॉटेलमध्ये मटण खाताना सीसीटीव्ही फुटेजवर दिसले, ज्यामुळे लोकांमध्ये संताप वाढला. पोलिसांच्या सहा पथकांनी कसून तपास केला आणि स्वारगेट परिसरातून त्यांना ताब्यात घेतलं. या अटकेनं बावधन पोलिसांना मोठं यश मिळालं. अटक झाल्यावर पत्रकारांनी राजेंद्रला प्रश्न विचारले, “हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?” यावर राजेंद्रनं कोणताही खेद व्यक्त न करता उलट माजोरपणानं उत्तर दिलं. वर नकारार्थी आणि उद्दामपणे हात हलवत राजेंद्र हगवणेने नकार दिला. त्याच्या या वागण्यानं त्याच्याविरुद्धचा रोष आणखी वाढला. त्याचा हा माज पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना स्पष्ट दिसला, ज्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर टीका होत आहे.
राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा तालुका अध्यक्ष होता, पण या प्रकरणानंतर अजित पवारांनी त्याला आणि सुशीलला पक्षातून काढून टाकलं. सुप्रिया सुळे यांनीही निष्पक्ष तपासाची मागणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. वैष्णवीच्या १० महिन्यांच्या बाळाला तिच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र महिला आयोगानं मध्यस्थी केली.