Advertisement
110 कोटींच्या खर्चातून उभारणार सुसज्ज दालनं
मुंबई : राज्याच्या राजकारणाचा आणि संपूर्ण राज्याचा कारभार जिथून चालतो, अशा मंत्रालयाचा उल्लेख होत राहतो. मंत्रीमहोदयांपासून ते अगदी सामान्य नागरिकांची इथं ये-जा असते. अनेकांच्या मागण्या इथूनच पूर्ण होतात, अनेक आदेश इथून पारित केले जातात आणि इथंच मंत्रीमंडळाच्या काही महत्त्वाच्या बैठका आणि नेतेमंडळींच्या भेटीगाठीसुद्धा पार पडतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या याच मंत्रालयासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.
मंत्रालयासाठी आता नवी सहइमारत
मागील काही वर्षांपासून मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रकल्प रखडलेला असला तरीही आता मात्र त्यात लक्ष दिलं जात असून, मंत्रालयासाठी नवी सहइमारत उभारली जाणार आहे. 20 मंत्र्यांसाठी तब्बल 110 कोटींचा खर्च करत या इमारतीमध्ये आधुनिक अन् सुसज्ज दालनं बनवण्यात येणार आहे.
कुठे असेल ही मंत्रालयाची नवी इमारत?
सध्या मंत्रालय आहे त्याच इमारतीलगतच मंत्रालय ॲनेक्सची पाच मजली नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी साधारम 110 कोटी रुपये इतका खर्च येणार असून या इमारतीत सुसज्ज दालनं तयार केली जाणार आहेत. नव्या इमारतीचं बाह्यस्वरूप सध्याच्या मंत्रालय इमारतीशी सुसंगत असणार आहे.
नव्या इमारतीची वैशिष्ट्य?
मंत्रालयाची नवी इमारत साधारण 100 दिवसांत बांधून पूर्ण करण्याचा मानस ठेवण्यात आला आहे. किंबहुना त्यासाठी मंत्रालयाशेजारीच असणाऱ्या उद्यानावर इमारतीचं बांधकाम हातीसुद्धा घेण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार पालिकेनं इथं तळ मजला अधिक पाच अशा बांधकामास परवानगी दिल्याचं कळतं. ही संपूर्ण इमारत प्री फॅब अर्थात आधुनिक तंत्रानं सिमेंट आणि स्टीलपासून पर्यावरणपूरक निकषांवर तयार केली जाईल.