Advertisement
पुणे : पुण्याचा पुढचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला आहे. तर, आपल्या 105 जागा भाजपकडे कायम राहणार आहेत. थोडक्यात गेलेल्या जागांवर महायुतीमध्ये चर्चा केली जाईल. आपण महायुती म्हणून लढण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू. तर निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच होतील असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. पुण्यात मुक्कामी असताना देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात ही महत्त्वाची अनौपचारिक बैठक बोलावली होती. यावेळेस फडणवीस यांनी पुणे महापालिकेत भाजपचा परफॉर्मन्स कसा आहे, निवडणुकीच्या संदर्भात पक्षाची तयारी कशी आहे या संदर्भात सविस्तर आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेतला. पुण्यामध्ये महायुतीची चर्चा झाली तर या 105 जागा सोडून पुढील जागांवर चर्चा करण्यात येईल असा सूचक इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे संभाव्य 166 नगरसेवकांपैकी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच 105 जागांवर भाजपने दावा ठोकल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांना हा फॉर्मुला मान्य असणार का? यावर पुण्यातील संभाव्य महायुतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.