Advertisement
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या एसटी महामंडळात मोठी भरती केली जाणार आहे. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25 हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेस चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तसेच वाहक पदांबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली.
मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन. 2024 पर्यंत मनाई केली होती. तथापि, येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांची लक्षणिय संख्या लक्षात घेता, नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या 307 व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
नव्या नोकर भरतीच्या अनुषंगाने एसटीच्या प्रत्येक खात्यांनी आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करणे संदर्भात एकत्रित मागणी सादर करावी, असे निर्देश संबंधित देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.एसटीच्या सक्षमीकरणासाठी कुशल मनुष्य बळाबरोबरच तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची भविष्यात एसटीला गरज भासणार असून त्या अनुषंगाने भारती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक म्हणाले.
