#

Advertisement

Saturday, May 24, 2025, May 24, 2025 WIB
Last Updated 2025-05-24T11:51:39Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

वैष्णवीला परत आणणे शक्य नाही, मात्र...!

Advertisement

वैष्णवीच्या पालकांच्या भेटीनंतर अजित पवारांचं भावनिक विधान 
पुणे :  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी असल्याची टीका वारंवार होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं जात आहे. अजित पवार तसेच त्यांच्या पक्षाने या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यातील वाकड येथे अनिल कस्पटे आणि कुटुंबीयांची आज त्यांच्या राहत्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. या दुःखद प्रसंगी त्यांच्याशी सहवेदना व्यक्त केल्या आणि त्यांचं सांत्वन केलं. कस्पटे कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या भावना मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.  
वैष्णवीला परत आणणे शक्य नाही, मात्र तिला, मानसिक वा शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कार्यवाही करणे निश्चितच शक्य आहे, याची ग्वाही दिली. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कुणाचीही गय करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला आधीच दिल्या आहेत. तसेच या प्रकरणाची जलद सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत घेण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून तातडीनं आदेश देण्यात येतील, असे ही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनी लगेच मान्य केली 'ती' मागणी
दरम्यान, काल सायंकाळी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनीही वैष्णवीच्या पालकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळेस गिरीश महाजन यांच्या फोनवरुन वैष्णवीच्या पालकांनी मुख्यमंत्री फडणवीसांबरोबर संवाद साधला. वैष्णवीच्या पालकांनी मुख्यमंत्र्यांकडे दोन प्रमुख मागण्या केल्या. आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी अनिल कस्पटे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलताना केली. त्यावर, वकिलासंदर्भातील मागणी मुख्यमंत्र्यांनी लगेच मान्य केली.