Advertisement
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले निर्देश
सोलापूर/ मुंबई : वैष्णवी हगवणेनंतर सोलापूरमध्ये आशाराणी भोसलेचाही हुंडासाठी छळ करण्यात आला. त्या छळाला कंटाळून तिने ही आत्महत्या केली. या प्रकणाची गंभीर दखल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत निष्पक्षपणे तपास करून न्याय दिला जावा असे थेट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी, तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या आशाराणी भोसले हीने तिन जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज माध्यमांतून समोर आला आहे. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींच्या मानसिक छळामुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. त्यांनी तातडीने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. शिवाय सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. आशाराणी भोसले या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांना दोन वर्षांची मुलगीही आहे. ही बाब मन हेलावणारी आहे असं त्या म्हणाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींकडून त्यांना सातत्याने छळ सहन करावा लागत होता. चार ते पाच वेळा घरगुती वाद निर्माण झाल्यानंतर त्यांच्या माहेरच्या मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
