Advertisement
शिवराज्यभिषेक सोहळ्यास येण्याचे लक्ष्मणराव ढोबळे यांचे आवाहन
सोलापूर : एक वेळ रायगडाच्या माथ्यावर जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन, ही वैभवशाली परंपरा जतन करताना मराठी मुलखावर राज्य करताना बारा बलुतेदारांना एकीच्या धाग्यात बांधून कुळवाडीच्या राजाने जीवाला जीव देणारे नितीचे नेकदार मावळे तयार केले. पराक्रमी पितृभक्त ईश्वरनिष्ठांची मांदियाळी राखणारा मातृत्वाच्या दर्शनाने वैभव निर्माण करणारा, असा जिजाऊ मातृभक्त अशा पराक्रमी राजाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र संघटितपणाने भगव्या झेंड्याच्या शिपायांना बरोबर घेऊन रायगड किल्ला चढला पाहिजे. ता. ६ जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनी रायगडाच्या माथ्यावर जाऊन शिवरायांपुढे एकदा तरी समाधीचे दर्शन घेत मुजरा केला पाहिजे.
रायगडावर पाण्याची व्यवस्था करणारा, लाखो सैनिकाचे रक्षण करताना त्याच्या राहण्याची व्यवस्था करणारा, तलवारीच्या खनखनाटात माय बहिणींच्या रक्षणासाठी रक्ताच्या बलिदानाची रांगोळी काढत मराठी मुलुख सांभाळणारा राजा आपल्या सगळ्यांचा आहे. इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाला गर्दी करण्यापेक्षा राजाच्या एका शब्दासाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांच्या रायगडाच्या पायथ्याशी एकत्र होऊन आपण अभिषेक सोहळ्याचे साक्षीदार होऊया. मावळ्यांच्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होऊयात, यासाठी अवघ्या मराठी मुलखातून एकत्र या, अशी मला विनंती करायची आहे.
राजाचा दरबार त्यामध्ये रचलेले मनसुबे हे मोगलांना, नामोहराम करण्यासाठी होते. रायगवडावरून दिल्लीच तख्तही थरथर हलत होते. एवढी जबाबदारी राजांनी त्या काळात या रायगडावरून पार पाडली. म्हणूनच सगळेजण आता नक्की ठरवूया, आपण आत्ता संकल्प करूया राजाच्या समाधीचे दर्शन घेऊन त्या समाधीवर माथा टेकवूया, समाधीवरची भगवी रक्षा घेऊया. राजांच्या समाधीच्या दर्शनाने पावन होऊ यात. माय बहिणींनो बंधू, भगिनींनो जिगरबाज तरुण मित्रांनो कळकळीची विनंती करतो की ता. ६ जूनला रायगडाच्या पायथ्याशी एकत्र येऊया. रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या राजाच्या समाधीचे दर्शन घेऊन पावन झालो की, छत्रपतींचा विचार काळजात जतन केरीत आपण आपल्या तालुक्यात, गावात, वॉर्डातही शिवरायाची पवित्रता आणू शकतो. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी लाख गेले तरी लक्षावधी मिळतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. या विचारातून ज्या मावळ्यांनी रक्त सांडले, त्यांच्यासाठी वचनबद्ध होऊ यात. चला रायगडावर जावूयात.
