Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी यापूर्वीच राज्य शासनावर केली टीका
मुंबई : लाडक्या बहिणींसाठीच्या निधीसाठी सरकारची दमछाक होताना दिसत आहे. कारण लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीला पुन्हा कात्री लावण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला आहे. अनुसुचित जाती घटकांसाठीचा 410. 30 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आला आहे. आतापर्यंत इतर विभागांचा 1 हजार 156.3 कोटींचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवला आहे. लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यासाठी सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येत आहे.
याबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी यापूर्वीच राज्य शासनावर टीका केली आहे. लाडक्या बहीण योजनेसाठीचा मे महिन्यातील हप्त्याचे नियोजन करण्याकरिता आदिवासी समाज कल्याण समितीचा निधी शासनाने वळविल्याने आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्याा निडणुकीत असा निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांच्या उमेदवारांना आडवे करा, असे आवाहन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले आहे.
आदिवासी समाज कल्याणचा निधी मिळविण्याकरीता 29 अनुसूचित जाती-जमातीतील आमदारांवर सरकारकडून दबाव आणल्याचेही ढोबळे यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे समाजाचा निधी वळविण्याचे काम करणाऱ्या मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आडवे करा, असे आवाहनही ढोबळे यांनी केलेले आहे.
जे मलुल आहेत, गरीब आहेत अशा आदिवासी आमदारांवर दबाव टाकण्याचे काम सरकारमधील मंत्र्यांनी केले आहे. ज्यांना अशा काही सवलती बद्दल माहितीही नाही अशा समाजाचा निधी वळविण्याचे धाडस जर सरकार करीत असेल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये मतांच्या ठोक्या गणिक दलितांचा निधी वळविणाऱ्या मंत्र्यांच्या लोकांना आडवं केलं पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
