Advertisement
संजय राऊतांकडून मोठा खुलासा
मुंबई : मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र मोर्चा काढणार आहे. दोन्ही पक्षांनी आपण जाहीर केलेल्या तारखांमध्ये बदल केला असून, आता 5 जुलैला हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन करुन आपल्याशी संपर्क केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच दोन्ही पक्षांनी एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्याआधी काय चर्चा झाली आणि तारीख का बदलली याचा खुलासा पत्रकार परिषदेत केला आहे. दोन्ही ठाकरे बंधू मनाने एकत्र आलेच आहेत असंही सूचक विधान त्यांनी केलं आहे.
तिसरी भाषा हिंदीच्या नावे लादली जात असून, आमच्या मुलांना हे ओझं पेलवणार नाही. सर्व भाषा तज्ज्ञांचं हे मत आहे. देशातील अनेक राज्यांनी ही भूमिका घेतली आहे. आमचा हिंदीला भाषा म्हणून विरोध नाही, पण अशाप्रकारे महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही. गुजरातला यातून वगळलं आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, राज ठाकरेंनाही भेटले असतील. सरकारसुद्ध आपल्या पद्धतीने सादरीकरण करत आहे. या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहे हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, 6 तारखेला आषाढी असल्याने आपण 7 तारीख ठरवली होती. सगळीकडे आषाढीचा उत्साह असताना मराठी माणसांपर्यंत पोहोचणं अडचणीचं जाईल. आपण एकत्र करणार असू तर काही अडचण नाही. 7 तारखेत त्यांनी सहभागी व्हावं किंवा 5 तारीख करावी असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानुसार राज ठाकरेंशी चर्चा केली आणि उद्धव ठाकरेंशी झालेलं बोलणं सांगितलं. मग त्यांनीही 5 तारखेवर संमती दर्शवली, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.