Advertisement
सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली भावना
सोलापुर : बोरामणी विमानतळासाठीची जागा जरी माझ्या कारकिर्दीत संपादीत केली असली तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे नाव काढून कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल. क्रेडीट मिळो ना मिळो.., पण, विमानतळ होणे महत्वाचे आहे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
सोलापुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली. तसेच, सध्याच्या होटगी रोड विमानतळाबाबतही भाष्य केले. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री आणि शिंदेंचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते.
अनेकदा विमानतळासंदर्भात भूमिका घेऊनही आमचं आंतरराष्ट्रीय विमानतळ काही होऊ शकले नाही, असा उल्लेख पुस्तकात आहे. मात्र, ती माझीही खंत आहे, केवळ तुमचीच नाही, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.
सोलापूर शहराच्या आतमध्ये असणारं होटगी रोड विमानतळ सध्या सुरू झाले आहे. पण, ते किती दिवस टिकणार आहे. आम्ही म्हणतो की, सत्ता त्यांची आहे. चालू द्या. तेवढं तरी चालू द्या. पण तेही विमानतळ चालत नाही. आम्ही आडवं घालणार नाही, त्यातून तुम्ही मार्ग काढा, असे आवाहनही सुशीलकुमार शिंदे यांनी विरोधकांना केले आहे. बोरामणीच्या नियोजित विमानतळासाठी लागणारी जमीन माझ्या कारकिर्दीत जरी संपादीत केली असली तरी भविष्यासाठी बोरामणीला आंतराष्ट्रीय विमानतळ करण्याकरिता आमचं नाव बाजूला काढून कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल. त्याचं क्रेडीट मिळो ना मिळो. तशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केलेल्या आहेत. पण, आम्ही कधीही त्याचं क्रेडीट घेतलं नाही, असा दावा शिंदे यांनी केला.