Advertisement
शासकीय कार्यालय प्रमुखांवर गुन्हा नोंदविण्याची बहुजन रयत परिषदेची मागणी
वर्धा : महापुरुषांच्या यादीत नोंद असूनही महाराष्ट्रात काही मोजक्याच शासकीय कार्यालयात डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते. शासनाच्या परिपत्रकानुसार साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती ज्या शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येणार नाही त्या कार्यालयातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी विदर्भ बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष अजय डोंगरे यांनी केली आहे.
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय कार्यालयात डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती साजरी होत नसल्याच्या मुद्यावर लक्ष वेधण्यात आले. यानुसार वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या महामानवांची महापुरुषांच्या यादीमध्ये नोंद आहे, अशा महामानवांची जयंती आणि पुण्यतिथी शासनाच्या कार्यालयात करून त्यांना मानवंदना देण्यात यावी, असे शासन परिपत्रकात नमुद आहे. परंतु, शासकीय कार्यालयातील काही अधिकारी हेतू पुरस्सर या आदेशाचे पालन करीत नाहीत. सदर बाब निदर्शनास आल्याने बहुजन रयत परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या जवळील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांची भेट घेत महामानवांची जयंती साजरी केली जाते की नाही, याची माहिती घेण्याची सूचना लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली होती, त्यानुसार सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे अजय डोंगरे यांनी सांगितले. तसेच, अशा कार्यालयातील अधिकाऱ्यांवर शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दलचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आल्याचेही अजय डोंगरे यांनी सांगितले. यावेळी अजय डोंगरे , महिला आघाडी अध्यक्षा हिराताई खडसे, कैलास मुंगले, सुनील पोटफोडे, विनोद आमटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.