Advertisement
शासकीय कार्यालय साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करा, अन्यथा गुन्हा
निफाड : महामानव व साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शासकीय व निमशासकीय कार्यालयांत जयंती साजरी करणे अनिवार्य असूनही अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता, बहुजन रयत परिषदेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शासकीय नियमानुसार जयंती साजरी केली नाही तर शासकीय नियम मोडल्याकामी गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी हेतू पुरस्सर जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करीत नाहीत. शासनाच्या परिपत्रकाचे उल्लंघन होत आहे, सदर मुद्याकडे लक्षवेधीत बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे तसेच प्रदेशाध्यक्षा प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या सुचनेनुसार राज्यभरात शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर निफाड तहसीलदारांना उत्तर महाराष्ट्रचे प्रवक्ते धनंजय जाधव व महिला आघाडीच्या मीनाताई जाधव यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटक ज्ञानेश्वर (नाना) जाधव, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भालेराव, मंगेश शिरसाठ, केदार वाकळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे नाव शासनाच्या अधिकृत महापुरुषांच्या यादीत असतानाही त्यांच्या जयंतीचे आयोजन केवळ काही निवडक शासकीय कार्यालयातच केले जाते, हे अत्यंत खेदजनक आहे. शासकीय परिपत्रकानुसार ज्या शासकीय कार्यालयांमध्ये महामानवांची जयंती साजरी केली जात नाही, त्या कार्यालय प्रमुखांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्व. बाळासाहेब बंदरे सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश शिरसाठ यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यभरात बहुजन रयत परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असून, आपल्या परिसरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, ग्रामपंचायती येथे भेट देऊन अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते का, याची पाहणी करीत जेथे दुर्लक्ष होत असेल, त्या कार्यालय प्रमुखांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे.