Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधला महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपाच्या वाट्याला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ या सूत्रावर एकमत झाल्याचेही समोर आले आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आज-माजी आमदार, विद्यमान तसेच माजी मंत्र्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी लवकरच महामंडळाचे वाटप केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. या महामंडळ वाटपातून महायुतीचे तिन्ही पक्ष आपापल्या नाराज नेत्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. राज्यात सिडको (CIDCO) आणि म्हाडा (MHADA) यासारखी चर्चेत असलेली आणि महत्त्वाची समजली जातात. या महामंडळांसाठीही महायुतीच्या पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच ही महामंडळे नेमके कोणाच्या पदरात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.