Advertisement
पहिली भारतीय महिला बुद्धिबळ विश्वविजेता होण्याचा मान
मुंबई : विदर्भ कन्या दिव्या देशमुख हिने भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर आणि भारतीय खेळाडू कोनेरू हम्पीला हरवून महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. या विजयासह तिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला असा बहुमानही पटकावला आहे. अंतिम सामन्यात दोन्ही भारतीय दिग्गजांमध्ये जोरदार स्पर्धा पाहिला मिळाली. दोन्ही शास्त्रीय सामने अनिर्णित राहिल्यानंतर रॅपिड टायब्रेकरमध्ये निर्णय घेण्यात आला ज्यात दिव्या देशमुखने हम्पीला 1.5-0.5 असा पराभव करुन तिने विजय मिळवला. यासोबतच बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर या शानदार विजयासह, दिव्या देशमुख ही भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली आहे. बुद्धिबळाच्या जगात ग्रँडमास्टर ही पदवी सर्वात प्रतिष्ठित मानली जाते. हे बहुमान मिळवणे कोणत्याही खेळाडूसाठी कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. या विजयानंतर दिव्याला बक्षीस म्हणून सुमारे 43 लाख रुपये मिळणार आहे. तर उपविजेता हम्पी यांना सुमारे 30 लाख रुपये देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन भारतीय बुद्धिबळपटू पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आले होते. दोन्ही खेळाडू आता 2026 मध्ये होणाऱ्या महिला उमेदवार स्पर्धेसाठी पात्र ठरल्या असून 8 खेळाडूंच्या उमेदवार स्पर्धेत पुढील जागतिक महिला अजिंक्यपद सामन्यात चीनच्या गतविजेत्या जू वेनजुनचा प्रतिस्पर्धी कोण आहे हे निश्चित होणार आहे.