Advertisement
केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 29अ मधील निवडणुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या 334 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. या कारवाईनंतर देशात आता सहा राष्ट्रीय आणि 67 प्रादेशिक पक्ष उरले आहेत. एखादा पक्ष सलग 6 वर्षे निवडणूक लढवत नसेल आणि पक्षात काही बदल झाल्यास त्याची माहिती कळविली जात नसेल तर आयोग अशा पक्षांची मान्यता रद्द करू शकतो. आयोगाने दोन महिन्यांपूर्वी 345 पक्षांची चौकशी करण्याचे निर्देश राज्यांतील अधिकाऱ्यांना दिले होते. यात असे आढळून आले की, 345 पक्षांपैकी 334 पक्ष आयोगाच्या नियमांचे पालन करीत नाहीत. आयोगाने या पक्षांची मान्यता रद्द केली आहे.
मान्यता रद्द झालेले महाराष्ट्रातील पक्ष
अवामी विकास पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रेटिक पार्टी, नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी, पीपल्स गार्डियन, लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना.