Advertisement
सांगली : सरकार साडेचार वर्ष राहणार असेल, तर यांचाच शर्ट पकडावा लागेल, नाहीतर काम होणार नाही. त्यामुळे मोठी रांग लागणार, असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं येत्या काही दिवसांत भाजपमध्ये अनेक मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार का? याची चर्चा रंगली आहे.
सांगलीत भाजपमध्ये काँग्रेसच्या माजी महापौर, नगरसेवक यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री चंदक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश सोहळा होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी हलक्याफुलक्या शैलीत भाष्य केले आहे. मात्र , त्यांच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.
ते म्हणाले की, 235 आमदारांचं सरकार आहे. त्यामुळे ज्यांना राजकारणात राहायचं आहे, त्यांना माहिती आहे की सरकार साडेचार वर्ष राहणार असेल, तर यांचाच शर्ट पकडावा लागेल, नाहीतर काम होणार नाही. त्यामुळे मोठी रांग लागणार, असे पाटील म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोणता बडा नेता भाजपच्या गळाला?
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कोणता बडा नेता भाजपच्या गळाला लागला? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SP)चे नेते जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना मध्यंतरी जोर आला होता. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसंच, अनेकदा त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातही जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती केली होती. तसंच, अनेकदा जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत असते. भाजपचा आजचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा सांगलीतच आहे. तसंच, सांगली हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. या सर्व कारणांमुळं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.