Advertisement
पोलिसाच्या कानशिलात लगावणे पडलं महागात
छत्रपती संभाजीनगर : माजी आमदार आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले नेत हर्षवर्धन जाधव यांना कोर्टाने दणका दिला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावणं त्यांना चांगलच महागात पडलं आहे. या प्रकरणी कोर्टाने जाधव यांना दोषी ठरवलं आहे. शिवाय त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा ही सुनावली आहे.
हे प्रकरण 2014 सालचे आहे. त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. त्यावेळी हॉटेल प्राईडमध्ये पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला हर्षवर्धन जाधव ही आले होते. मात्र त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तिथे सुरक्षेसाठी असलेले पोलिस निरिक्षक पराग जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांना रोखलं. त्यामुळे हर्षवर्धन यांना राग आला. त्यांनी त्या रागाच्याभरात पोलिस निरिक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणात न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट सुद्धा जारी केला होता. 17 फेब्रुवारी रोजी जाधव न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली होती. नंतर त्यांना जामीनही मंजूर झाला होता. त्याच प्रकरणाचा निकाल आज बुधवारी लागला. हर्षवर्धन जाधव यांना वरच्या कोर्टाच अपिल करण्याची मुभा आहे. या प्रकरणी शासनातर्फे ॲड. चारुशीला पौनिकर यांनी, हर्षवर्धन जाधव यांच्यातर्फे ॲड. प्रकाश जयस्वाल यांनी बाजू मांडली.