Advertisement
मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजिमयने 28 जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आरती अरुण साठे, अजीत भगवानराव कडेथांकर आणि सुशील मनोहर घोडेश्वर यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांच्या नेमणुकीनंतर वादाला तोंड फुटलं आहे. सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं असल्याचं मत मांडत आमदार रोहित पवारांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. रोहित पवार यांची राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेत या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. आरती साठेंच्या नेमणुकीवर संजय राऊतांची सडकून टीका केली आहे.
आरती साठे कोण आहेत?
मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आरती अरुण साठे या मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख होत्या. त्यांची फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. साठे यांनी वर्षभरानंतर जानेवारी 2024 मध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर 6 जानेवारी 2024 मध्ये त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यता आणि मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदावरुन राजीनामा दिला. आरती साठे यांचा वकील म्हणून 20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. ते प्रामुख्याने प्रत्यक्ष कर प्रकरणांच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरण (SAT) आणि कस्टम्स, एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स अपीलीय न्यायाधिकरणासह मुंबई उच्च न्यायालयाच्या वैवाहिक वादांमध्ये प्रमुख वकील म्हणून काम केले आहे. आरती साठे यांचे वडील अरुण साठेदेखील एक प्रसिद्ध वकील आहेत. ते आरएसएस आणि भाजपशी संबंधित आहेत.