Advertisement
फक्त 3 दिवसांत पडला अर्ध्या महिन्याचा पाऊस
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार , 17 ऑगस्ट 2025 सकाळी 8:30 ते 19 ऑगस्ट 2025 दुपारी 2:30 या 54 तासांच्या कालावधीत शहरात विक्रमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, या काळात कुलाबा येथे ऑगस्ट महिन्याच्या एकूण सरासरी पावसाच्या 37% (179 मिमी) तर सांताक्रुझ येथे 86% (489 मिमी) पाऊस नोंदवण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4 ते दुपारी 3 या 11 तासांच्या कालावधीत शहराच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच 45 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे.
मध्य रेल्वे कोलमडली, प्रवाशांची वाट लागली
मुसळधार पावसामुळे मुंबईची रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सीएसटी ते ठाणे दरम्यान मेन लाईनवर आणि सीएसटी ते मानखुर्द दरम्यान हार्बर रेल्वेवर बंद आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे. बीईएसटीच्या बसेस 28 ठिकाणी पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.