Advertisement
बीड : गेवराईमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या बैठकीत विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर या दोन नेत्यांमधील वादाला सुरुवात झाली होती. हाके यांच्या विधानाचा निषेध करत पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते, त्यामुळे हा वाद आणखी पेटला होता.
आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा देत चलो मुंबईचे बॅनर लावले होते. त्यामुळे हाकेंनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी, ‘कुणाच्याही दहशतीखाली राहणारे आम्ही नाही आहोत. गावगाड्यामध्ये राहणारे आम्ही आहोत. बास झालं तुमचं शोषण, तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतो. आम्ही सुद्धा मर्दाची औलाद आहे. तुझ्या गावात आलो आहेत 500 किलोमीटर अंतरावरून. दम असेल तर बाहेर ये, असं आव्हान आमदार विजयसिंह पंडित यांना दिलं आहे.
पंडित यांनी केली होती हाकेंवर टीका
याआधी विजयसिंह पंडित यांनीही लक्ष्मण हाके यांच्यावर सडकून टीका केली होती. पंडित यांनी, ‘लक्ष्मण हाके हा श्वान आहे. त्यावर जास्त मी बोलणार नाही आणि हा अदखलपात्र हा माणूस आहे. आमच्या मतदार संघातील लोकांनी या लक्ष्मण हाके नावाच्या श्वानाला ओळखलं आहे. याने या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला होता. त्याने ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याचं डिपॉझिट जप्त झालं आहे. हा दलाल श्वान आहे आणि हा स्ट्रीट डॉग आहे आणि हा रिचार्जवाला डॉग आहे. त्यामुळे आम्हाला सगळं माहीत हा कोणाच्या बोलण्यावरून भुंकतो आहे, ते आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत’ असं विधान केलं होतं.