Advertisement
साहित्यरत्न अण्णा भाऊंच्या कांदबर्यांतील स्त्री नायिकांवरील भाष्यातून समाजजागृती
विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या समाज जागृतीकरीता नेहमीच विविध उपक्रम राबवित असतात. याच पार्श्वभूमीवर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर भाष्य कारणारी त्यांनी तयार केलेली यु-ट्यूबवरील कथा मालिका सध्या गाजते आहे. आजच्या स्त्रियांबाबत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कांदबर्यांतील नायिका काय संदेश देतात, याविषयी त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय सोप्या आणि सामान्यातील सामान्यांना समजेल अशा शब्दांत अॅड. कोमलताई यांनी केलेले कथाकथन भारावून लावणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे आहे. त्यांच्या या मालिकेविषयी...
.......................
मी अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे..., आपण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कथा कादंबर्यांमध्ये रेखाटलेल्या स्त्रीयांविषयी अर्थात नायिकांविषयी जाणून घेणार आहोत अण्णा भाऊंनी आपल्या आयुष्यात विविध लेखन केले. 35 कादंबर्या, सात चित्रपटकथा, 15 पोवाडे, 15 लोकनाट्य, 13 कथासंग्रह यासह प्रवास वर्णन असे साहित्य त्यांनी वाचकांच्या ओंजळीत टाकून साहित्यविश्व समृद्ध केले. त्यांच्या या साहित्य वाचनानंतर आज, आपण एकविसाव्या शतकात जगत असतानाही आजची स्त्री खर्च सबला झाली आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
स्त्रियांना समाजाने अनेक हक्क, अधिकार दिले. पण, प्रत्यक्ष तो त्यांना मिळाला का? खरंतर आजही स्त्रियांना आपल्या हक्कासाठी बोलण्याची मुभा मिळत नाही, तिचे दमन होते हे सत्य आहे. अण्णा भाऊ यांनी स्त्रियांना कादंबर्याचे नायक बनवले त्यांच्या कादंबर्यांमध्ये नायिका कथेला व्यापून टाकतात. त्यांची स्त्री नायिका समजून घेताना ती कोमल आणि वज्राहून कठीण, असे चित्र रेखाटले आहे. अण्णा भाऊंचे साहित्य मनाला ओढ लावते, उत्सुकता निर्माण करते. अण्णा भाऊंनी कथांतून रेखाटलेल्या मंगला, वैजंता, आवडी, चित्रा, अवी, रत्ना, सीता या नायिका स्पष्ट व रोखठोक प्रश्न विचारून आजही समाजाला घायाळ करतात. त्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी व अस्मितेसाठी जबरदस्त झगडणार्या आहेत. जीवन जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली होताच या नायिका पेटून उठतात.
वारणेच्या खोर्यामधील मंगला ही एक विरांगना आहे ती एक क्रांतिकारी मराठी स्त्री आहे. आई-बापाची ती लाडकी आहे. वानान, गुणांने ती गावात उजवी आहे. तिचा भाऊ तिचे लग्न नागोजी सोबत ठरवून येतो. पण, तो देशद्रोही असतो. पण, मंगला त्याला नकार देते. इंग्रजी साम्राज्या विरोधात प्राणप्रणाने लढणार्या हिंदुरावशी ती लग्न करते.हिंदुरावच्या बरोबरीने हातात बंदूक व काढतुसाची माळ घालून ती दुश्मनांशी लढते. लढता लढता काडतुसे संपतात. एकमेकांना गोळ्या घालून बलिदान देतात, स्त्री जशी कोमल, मृदु, दयाळू आहे तशीच ती निश्चय कठोर व पराक्रमी आहे याचे मंगला हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
मंगलाप्रमाणेच आवडी ही एक बंडखोर स्त्री असते आवडी ही कादंबरी सत्य कथेवर आधारलेली आहे ग्रामीण कुटुंबामध्ये स्त्रियांच्या सुखरूप किंवा सुख स्वप्नांचा कसा चुराडा होतो, हे सत्य अण्णा भाऊंनी दाखवल आहे. आवडीची लग्नामध्ये फसवणूक होते. फेफंर येणार्या पुरुषासोबत तिची लगीनगाठ बांधली जाते. ही गोष्ट जेव्हा तिला कळते तेव्हा तिचं मन दुखा:ने होरपळून जाते. तिच्या सासरी येणार्या धनाजी रामोशावर तिचे प्रेम जडते व ती त्याच्यासोबत पळून जाते, सुखाचा संसार करते. आवडीचे हे बंड अभुतपूर्व आहे. धनाजी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो व गावाविरुद्ध लढण्यास तयार होतो. पण, आवडीचा सख्खा भाऊ सुडाने पेटून उठतो व बहिणीचा खून करतो.
स्त्री ही या समाजव्यवस्थेत वर्षानूवर्ष कुजत पडलेली असली तरी तिलाही एक मन आहे. तीही एक माणूस आहे, हे आज तरी आपण मान्य करणार आहोत की नाही? पोटाची खळगी भरण्यासाठी तमाशाच्या फडात नाचणार्या स्त्रियांच्या जीवनावरील चित्रकथा मन हेलावून टाकते वैजयंता या कादंबरीत अण्णा भाऊंनी तमाशा कलावंतांचा जीवन संघर्ष रेखाटला आहे. वैजयंता ही एकदा आईच्या हट्टपायी तमाशात नाचते, पण नंतर तिच्याच आयुष्याचा तमाशा होता. थिएरचा मालक बाबालाल तिचा सत्कार करतो, पण त्याचा मुलगा चंदुलाल तिच्या मागे लागतो. वैजयंताचे उमावर प्रेम असते, त्याच्यासोबत सुखी संसाराचे ती त्याच्यासोबत सुखी संसाराची ती स्वप्न पाहत असते. पण, ती फडात नाचते म्हणून उमा तिच्यावर नाराज असतो. वैजयंता तमाशा नाचणारी स्त्री असली तरी ती शीलवान आहे, चरित्राला जीवापाड जपणारी आहे. जेव्हा चंदुलालचा नोकर बळी तिला मिळवण्याची भाषा करतो, तेव्हा ती म्हणते जीभ आवरा नाहीतर रडकी होईल, एक दात उरणार नाही तोंडात. वैजयंताला तमाशा किंवा तमाशा कलावंताविषयी लोकांच्या मनात जो समज होता तो मान्य नव्हता आपल्याशी आजही तमाशा कलावंतांची चित्रकथा संपलेली नाही. शासनाने आणि लोकांनी त्यांच्याकडे कलाकार म्हणून पहावे त्यांच्या कलेला दाद द्यावी त्यांचा सन्मान करावा, असं घडलं तरच तमाशा कलावंतांचं जगणं सुसह्य होणार आहे.
देवाला सोडलेली मुरळी आपल्या आईला विचारते आई ज्या देवाशी आईचं लग्न होतं त्याच देवाशी तिच्या मुलीचं लग्न कसं होऊ शकतं. खरं तर हा प्रश्न तिने आईला नाही तर या समाज व्यवस्थेला विचारलेला आहे. चिखलातील कमळ या कादंबरीत अण्णा भाऊंनी मुरळीच्या जीवन संघर्षाची कहाणी सांगितली आहे. मुरळीची मुलगी म्हणून मुरळीच जीवन जगणारी सीता ही अत्यंत रूपवान देखनी, सुंदर असल्यामुळे अनेक जण तिच्यासाठी झुरणीला लागतात. पण, तिचे बळीवर प्रेम असते. ती आपल्या प्रेमाला दगा देत नाही. तिचा जन्म झाल्यानंतर तिच्या आईने तिचे खंडोबा सोबत लग्न लावलेले असते. पण, ती शेवटी बळी सोबतच लग्न करते आणि चालत आलेली प्रथा मोडीत काढते.
अण्णा भाऊंच्या कादंबरीतील स्त्रियांचं जग उपेक्षित आहे अनेक समस्यांनी घेरलेले आहे स्त्रियांच्या जीवनात पारंपरिक साखळदंडाने जखडून टाकलेला आहे. पण, याही परिस्थितीत त्या डगमगत नाहीत. मनातला निर्धार कृतीतून सिद्ध करतात त्या स्वतः उध्वस्त झाल्या तरी इतरांना जगवतात. जगवणार्या माणसांच्या कथा अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीतून जिवंत केल्या. अण्णा भाऊंची प्रत्येक नायिका ही प्रचंड कष्ट करणारी, जीवावर उदार होऊन जगणारी आहे. ती फाटकी-तुटकी असली तरी स्वातंत्र्याच्या व स्वाभिमानाच्या प्रेरणांनी भारावून गेलेली आहे. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यामध्ये स्त्रीची लाज राखली आहे, तिची शान वाढवली. सलाम त्यांच्या लेखणीला आणि त्यांच्या साहित्य कृतींना.