Advertisement
वैद्यनाथ बँकेवर 59 वर्षापासून मुंडे घराण्याचे वर्चस्व कायम
बीड : वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी बँकेच्या 17 ही जागेवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. विरोधी पक्षाच्या पॅनलला अनेक ठिकाणी खातं सुद्धा उघडता आले नाही. मतमोजणी अखेर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पॅनलने बाजी मारली. विजय खेचून आणल्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. तब्बल 59 वर्षापासून वैद्यनाथ बँकेवर मुंडे घराण्याचे वर्चस्व कायम आहे.
वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या 36 मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. एकूण 43 हजार 962 मतदारसंख्येपैकी 16 हजार 287 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदानाची टक्केवारी 37.5 इतकी नोंदवली गेली. नेहमीपेक्षा कमी मतदान झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. एकूण 17 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी चार जागा आधीच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने जिंकल्या आहेत. उर्वरित 13 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली.