Advertisement
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. जांभूळघाट येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 9 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. चिमूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेत एकूण 538 विद्यार्थी असून 9 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने या विद्यार्थ्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. जेवण केल्यानंतर मुलं-मुलींना रक्ताच्या उलट्या, हातापायांना सूज, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. आदिवासी संघर्ष समिती सदस्यांनी शाळेत जाऊन विचारपूस केली असता शिळे अन्न दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान, या विद्यार्थ्यांना नेमका कशाचा त्रास झाला, याचा शोध घेतला जात असून त्यांच्या विविध तपासण्या केल्या जात आहेत, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात विविध जिल्ह्यात सरकारच्या माध्यमातून आश्रमशाळा चालवल्या जातात. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थाना मिळणाऱ्या सुविधा प्रमुख्याने अन्नाच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी केल्या जातात.