Advertisement
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा २०२५ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा मानला जातो. आगामी महापालिका निवडणुका तसेच वारंवार होणाऱ्या ठाकरे बंधुंच्या भेटी या पार्श्वभूमीवर हा मेळावा विशेष मानला जातो. दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उपस्थिती असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कवर यंदा हा मेळावा आयोजित करण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा ‘शिवतीर्थ’वर घुमणार आहे. हा मेळावा 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या परंपरेचा भाग आहे, जो शिवसैनिकांसाठी राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून दिशादर्शक ठरताना दिसतो.
राज ठाकरे यांना आमंत्रण?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा शिवसेनेची रणनीती आणि मराठी अस्मितेचा मुद्दा ठळकपणे मांडेल. उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतील. यावर्षी मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आमंत्रित करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ठाकरे बंधूंची एकजूट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. सचिन अहिर यांनी हा मेळावा ‘न भूतो न भविष्यति’ असा असेल, असे सूचक विधान केले आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला शिवाजी पार्कचे मैदानात निश्चित झाले आहे.
