Advertisement
बीड : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे. या जीआरनंतर आता बंजारा समाज देखील आक्रमक झाला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार काही ठिकाणी बंजारा समाजाची नोंद ही एसटी प्रवर्गामध्ये आहे. त्यामुळे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करून आमचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आता बंजारा समाजामधून सुरू आहे. आपल्या मागण्यांसाठी बंजारा समाजाच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे. बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाची मागणी सुरू आहे. आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील बंजारा समाजाच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे. मात्र, बीडमध्ये बंजारा समाजाच्या मागणीबाबत बोलत असताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर बंजारा समाजानं आक्षेप घेतला आहे. वंजारा आणि बंजारा एकच आहे, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावरून बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. वंजारा बंजारा एक नाही. या अगोदरच तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. वंजारा- बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, अशी मागणी करत बंजारा समाजाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे बंजारा आणि वंजारा एक, या आपल्या विधानावरून धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
