Advertisement
नाशिक : शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आक्रेश मोर्चा निघाला आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चामध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आक्रोश मोर्चामध्ये बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या संकटांवर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे, गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, नाशिकमध्ये ही तर सुरुवात आहे, असा इशाराही यावेळी शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
ते म्हणाले की, मी कृषीमंत्री होतो, शेतकरी आत्महत्येची घटना माझ्या वाचनात आली, तेव्हा मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव का देतो? हे समजून घेतले पाहिजे. दिल्लीत बसून हे होणार नाही, त्यासाठी जिल्ह्यांना भेटी दिल्या पाहिजे. ते तयार झाले. आम्ही नागपूर, अमरावती, यवतमाळला गेलो, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या कुटुंबाला भेटलो. त्यावेळी त्या शेतकऱ्याची बायको ढसाढसा रडली, मी आत्महत्येचं कारण विचारलं, तर ती म्हणाली सोसायटीचं कर्ज काढले होते, खासगी सावकाराचं कर्ज थकलं होतं. तो येऊन भांडे घेऊन गेला, आणि इकडे मालकांनी जीव दिला. कर्जबाजारीपणा हा मोठा रोग आहे, त्याव उपचार केले पाहिजेत, म्हणून 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं.
