Advertisement
पुणे : राज्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. सोलापुरातही पावसाचे थैमान घातले आहे. कोकणपासून ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होत आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसासह काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. तर दुसरीकडे संभाजीनगर येथेही मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
सोलापूर शहर परिसराला झोडपले
सोलापूर शहर परिसराला शनिवारी दुपारी सलग तिसर्या दिवशीही पावसाने झोडपले. सततच्या पावसाने शहराच्या सखल भागात पाणी साचून शहर तुंबल्याची द़ृश्ये जागोजागी दिसून आली. मुसळधार पावसामुळे सोलापूर-गोवा विमानसेवा एक दिवसासाठी रद्द झाली. दरम्यान, मंगळवार बाजार येथील चडचणकर पेट्रोलपंप पाण्याखाली गेला.सात रस्ता ते विजापूर रोड भागात मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर आले. यापाण्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ढगांमुळे अंधारुन आले. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपले. सलग तीन दिवसांपासून शहरात पावसाची धुवाँधार वृष्टी होत असल्याने शनिवारी अवघ्या तासाभराच्या पावसानेही शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. अनेक भागातील घरे जलमय झाली.
पुण्यात पावसाचा कहर
पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील थेऊर येथे रात्रभर पडलेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरलं असून नागरिकांना रेस्क्यू करत घरातून बाहेर काढावं लागल. अद्यापही या परिसरात मुसळधार पाऊस असून नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूसह शेतीचे प्रचंड नुकसान झाल आहे. गावातील ओढ्याचं पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने 70 नागरिकांना रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप वाचवण्यात यश आलं असून या पुरामध्ये मात्र अनेक मुक्या प्राण्यांचा मृत्यू झाला, शेळ्या मेंढ्यास गाईंचाही या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
अहिल्यानगरमध्ये सर्वत्र पाणीच पाणी
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसासह काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती करंजी येथे ढगफुटी झाल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी पोलीस कर्मचारी महसूल प्रशासन आणि रेस्क्यू टीम गावामध्ये दाखल झाले आहेत. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल आहे. विशेषतः शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे जनावरं आणि शेतीचं मोठं नुकसान झाल आहे.
आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस
बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाचा कहर दिसून येतोय. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढल. आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल आहे. परिणामी परिसरातील सुलेमान देवळा, दौलावडगाव परिसरातील 30 गावांचा संपर्क तुटला आहे. सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. बीड अहिल्यानगर महामार्गावरील धानोरा इथल्या कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन तहसील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आल आहे.
जालन्यात मुसळधार
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात शनिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गल्हाटी नदी आणि मांगणी नदीला मोठा पूर आला. या पावसामुळे शेती शिवारात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे. गल्हाटी नदीकाठच्या शहापूर दाढेगाव, करंजळा, घुंगर्डे हदगाव, गोंदी या शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले. अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील मांगनी नदीच्या पुराच्या वेढ्यात एक आदिवासी कुटुंब अडकले होते. त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी नगरपरिषद अंबडचे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं आहे.
