Advertisement
मराठवाड्यातील पूरस्थितीनंतर नेत्यांचे दौरे पण...
सोलापूर : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडला आणि त्याचं प्रमाण मराठवाड्यात तुलनेनं जास्त असल्याची अधिकृत आकडेवारी यंत्रणांनी सादर केली. मागील काही दिवसांपासून सातत्यानं मराठवाड्याती पूरस्थितीचे असंख्य व्हिडीओ समोर आले. याच व्हिडीओंमध्ये एका अशा व्हिडीओनं लक्ष वेधलं, ज्या घटनेच्या आठवणी कटू असल्या तरीही पीडितांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या एका नेत्यानं अनेकांपुढं आदर्श ठेवला आहे. 1993 मध्ये मराठवाड्याच्या लातूर इथं, किल्लारी गावाला भूकंपानं उध्वस्त केलं आणि या आपत्तीनं अनेक निष्पाप बळी घेतले. कोलमडलेल्या या गावाला पुन्हा उभं करण्यात मदत करण्यासाठी म्हणून घटनास्थळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पोहोचल्याच्या क्षणांचा हा व्हिडीओ आहे.
किल्लारीच्या भूकंपात मुख्यमंत्री पवार साहेब थेट धावून गेले, जनतेच्या जिव्हाळ्याने आधार बनले. आजच्या पूरस्थितीत मात्र मुख्यमंत्री कार्यक्रमांच्या चमचमत्या दिव्यांमध्ये गुंग आहेत, थोडी टीका काय झाली तर दौरा काढला पण जनता पाण्यात तडफडतेय आणि सरकार बघ्याची भूमिका घेतंय. आज अशा वेळी पवार साहेबांची आठवण नक्कीच येते!, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं असून राजकीय दृष्टीकोन बाजुला ठेवत महाराष्ट्राच्या राजकारणात मोलाचं योगदान देणाऱ्या पवारांचं हे रुपही अनेकांची मनं जिंकत आहे.

