Advertisement
बहुजन रयत परिषदेच्यावतीने निवेदन
अहिल्यानगर : संपूर्ण जिल्हाला पावसाचा फटका बसला आहे, यातून शेतपीके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, स्थावर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे, शासकीय अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींना हा प्रश्न गांभीर्याने हाताळावा, अशी मागणी करीत बहुजन रयत परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच खासदार निलेश लंके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सूचनेनुसार सदर निवेदन देण्यात आल्याचे बहुजन रयत परिषद अहिल्यानगर प्रदेश उपाध्यक्ष प्रा.ना.म.साठे यांनी सांगितले.
बहुजन रयत परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतपिके वाहून गेली आहेत. घरांचे, जनावरांचे, रस्त्यांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकरी व सर्व सामान्य कामगार यांच्या घरातील मालमत्तेचे व दैनदिन वापराचे तसेच अन्नधान्य आदी संसरोपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात पूराच्या पाण्याने वाहून गेले आहे, जीनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याअनुषंगाने, अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त गावांत ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकरी, मजूर, नागरिक, तसेच व्यवसायिकांना तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी. गावागावात आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, अन्नधान्य, जनावरांसाठी चारा व औषधे उपलब्ध करून द्यावीत. शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाकडून मदतकार्य जलदगतीने सुरू करावे.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रा. बापूसाहेव गायकवाड, जिल्हा सचिव संतोष साळवे, जिल्हा युवाध्यक्ष रवि करनगरे, जिल्हा युवाध्यक्ष धंनजय लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल ससाणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
