Advertisement
सांगली : सांगलीमध्ये असणाऱ्या बेडग या गावामध्ये फक्त बुलेटच दिसतात. प्रत्येक घरात इथं एक किंवा त्याहून जास्त बुलेट असून इथं या दुचाकीकडे गावकरी वाहन नव्हे तर अभिमान आणि रुबाबाची गोष्ट म्हणूनही पाहतात. रॉयल एनफिल्डच्या बुलेटमुळं या गावाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. साधारण 17000 लोकसंख्या असणाऱ्या या गावात 3500 कुटुंब राहतात.
बेडग गावातील तरुण बुलेट रायडिंग क्लब चालवतात, अनेकांना बुलेट चालवायलाही शिकवतात. तरुणच नव्हे, तर गावातील तरुणींनासुद्धा बुलेटचा नाद आहे. गावाबाहेर पडतानाही इथली मंडळी त्यांची बुलेट विसरत नाहीत. शिकण्यासाठी किंवा इतर काही कारणानं गावाबाहेर गेलं असतानाही ही मंडळी बुलेट सोबत घेऊन जातात.
हे गाव सुरुवातीच्या काळात दुष्काळग्रस्त होतं. पण, गावात पाणी आलं आणि पाहता पाहता गावाचा कायापालट झाला. गावात सुबत्ता आली आणि सोबतच आली ती म्हणजे बुलेट. लहानातील लहान काम असो किंवा सणावाराला मिरवायचा रुबाब असो, ही बुलेट दिसल्यावाचून गावात एकही दिवस जात नाही. म्हणूनच की काय महाराष्ट्रातील असंख्य गावांमध्ये सांगलीतील हे बेडग गाव त्याचं वेगळेपण जपून आहे.
