Advertisement
ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
मुंबई : ता. ११ : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या उद्दिष्टांनुसार समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. तथापि, योग्य कार्यवाहीअभावी काही योजनांचा लाभ लाभाथ्यापर्यंत पोहचत नाही, यामुळे समाजाच्या विकासात अडथळे निर्माण होत आहेत. याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्यावतीने परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्यावतीने निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या.सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासंदर्भात ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी निवेदनातून म्हंटले आहे की, 22 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने जाहीर केलेल्या नवीन निर्णयानुसार, महामंडळाच्या 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज योजनेसाठी आता दोन ऐवजी फक्त एकाच जामीनदाराची आवश्यकता आहे. या नवीन शासन निर्णयाची महामंडळाने त्वरित अंमलबजावणी करायला हवी. महामंडळाअंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्जासाठीची ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची वेबसाइट बंद आहे. ही वेबसाइट तातडीने सुरू करावी, महामंडळातील भरतीत मातंग समाजाला प्राधान्य देणे गरजेचे आहे, याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने व्हावी, महामंडळात होणाऱ्या नवीन भरती प्रक्रियेमध्ये मातंग समाजातील सुशिक्षित तरुणांना प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरून त्यांना नोकरीची संधी मिळेल आणि ते समाजाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतील याशिवायस महामंडळाने समाजातील होतकरूंसााठी उद्योजकता विकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करावेत. विकास महामंडळाचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थायी जिल्हा व्यवस्थापकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, यातून कमी वेळेत लाभार्थ्यांपर्यंत योजना वेळेत आणि वेगाने पोहचू शकतील, इतर मागासवर्गीय महामंडळाप्रमाणे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील लाभाथ्यर्थ्यांना 50 हजारांचे अनुदान देण्यात यावे. यासह महामंडळाच्या पत्र क्र. एसएलएएसव्हीएम / व्यस/प्रकरण/एपीओ/618/2021-22 नुसार बॅंड दुकानदार आणि त्यावर उपजीविका करणाऱ्यांची जिल्हा निहाय यादी तयार करण्यात आली आहे का? नसेल तर योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे आदी महत्त्वपूर्ण मुद्दे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले असून याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली असल्याचेही ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले. यावेळी प्रदेश सरचिटणीस इश्वर क्षिरसागर, प्रदेश उपाध्यक्ष ना. म. मराठे, विदर्भ विभाग अध्यक्ष अजय डोंगरे, मुंबइ विभाग अध्यक्ष सिद्रामप्पा शिवशरण, मराठवाडा विभाग अध्यक्ष योगेश येडाळे यांच्यासह राज्यभरातील जिल्हा तसेच तालुका पातळवरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
