Advertisement
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून गाड्या पंक्चर करण्यात आल्याचा दावा करणारा धक्कादायक व्हिडीओ 10 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी अब्दुल्ला अलमोहम्मदी नावाच्या इसमाने आपल्या एक्स अकाऊंटवरुन व्हायरल केला आहे. मात्र, या व्हिडीओसंदर्भात एका पोलिसांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
समृद्धी महामार्गावर खिळे लावले होते ही अफवा असल्याचा खुलासा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू होतं. त्यासाठी रस्त्यावरील दुभाजकाजवळ बोल्ट लावले होते. या बोल्टच्या माध्यमातून रस्त्यात केमिकल सोडण्यात येत होतं. हे बोल्ट लावल्यावर आजूबाजूला बॅरीगेडिंगसुद्धा करण्यात आलं होतं. मात्र वाहनांमुळे ते बॅरिकेडिंग तुटलं आणि ते बोल्ट रस्त्यावर दिसले असं पोलिसांचं म्हणणं आहे. आज सकाळी (मंगळवारी) हे बोल्ट काढून घेण्यात आलेल्याची माहिती, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. चोरीच्या उद्देशाने व अजून कुठल्याही कारणाने हे खिळे लावलेले नव्हते. मुळात हे खिळे नसून केमिकल सोडणारे बोल्ट होते असा खुलासा संभाजीनगर पोलिसांनी केला आहे.
एमएसआरडीसीचं स्पष्टीकरण
रस्त्याच्या मजबुतीकरणाअंतर्गत हे बोल्ट लावण्यात आलेले असं एमएसआरडीसीने म्हटलं आहे. तसेच या ठिकाणी बॅरीगेडींग न केल्याने कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात येणार असल्याचंही त्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटल आहे.
