#

Advertisement

Tuesday, October 14, 2025, October 14, 2025 WIB
Last Updated 2025-10-14T12:31:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मतदार याद्यांत त्रुटी : तोपर्यंत निवडणुका घेऊ नका !

Advertisement

निवडणूक आयोगाकडे राज ठाकरेंची थेट मागणी

मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षांकडून मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ, नावांची पुनरावृत्ती आणि खोट्या मतदार नोंदणीच्या मुद्द्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांसारखे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत निवडणूक आयोगाला जाब विचारला. तसेच मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी थेट मागणी राज ठाकरे यांनी केली. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदानाचा हक्क का मिळत नाही आणि निवडणूक जाहीर नसतानाही अचानक मतदार नोंदणी का थांबवली, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
३१ जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? अशी विचारणा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली. मतदार यादीत इतका घोळ असताना निवडणूक कशी घेणार, असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी केला. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवावे, अशी मागणीही राज ठाकरेंनी यावेळी केली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनीही मतदार प्रक्रियेवर शंका व्यक्त केली. मतदान कुणाला जातं हे कळत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देशात आता कुठेच निवडणुका नाहीत, तर VVPat (व्हिव्हिपॅट) मशीन आणा. व्हिव्हिपॅट मशीन लावा, असे म्हटले.