Advertisement
दरवर्षी तब्बल 30 कोटी रुपयांची उलाढाल
पुणे : दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण आता आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या पारंपरिक फटाक्यांना बाजूला सारून ‘ग्रीन फटाक्यां'ची एक नवी लाट आली आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी उभं आहे महाराष्ट्राचं एक छोटंसं गाव धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यातील तेरखेडा. हे गाव आज 'महाराष्ट्राचं शिवकाशी' म्हणून ओळखले जाते, कारण येथे दरवर्षी तब्बल 30 कोटी रुपयांची उलाढाल होवून फटाके तयार होतात आणि आता इथेही पर्यावरणपूरक ग्रीन फटाक्यांच्या उत्पादनाने जोर धरला आहे.
ग्रीन फटाके म्हणजे असे पर्यावरणपूरक फटाके जे पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) यांनी हे फटाके विकसित केले आहेत. सण-उत्सवांच्या काळात, विशेषतः दिवाळीत होणारे वायू प्रदूषण कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेट, आर्सेनिक, लीड यांसारखे घातक विषारी घटक वापरले जातात, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याउलट, ग्रीन फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर कमी हानिकारक ऑक्सिडायझरचा वापर केला जातो, ज्यामुळे पार्टिक्युलेट मॅटर (PM) उत्सर्जनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट होते.
ग्रीन फटाके पूर्णपणे प्रदूषणमुक्त नसले तरी पारंपरिक फटाक्यांपेक्षा कमी धूर आणि कमी आवाज करतात. यांचा आवाज 125 डेसिबलपेक्षा कमी नियंत्रित केला जातो, ज्यामुळे ध्वनी प्रदूषणालाही आळा बसतो. या फटाक्यांमुळे वायू गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, म्हणूनच सुप्रीम कोर्ट आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) यांनी सणासुदीच्या काळात फक्त ग्रीन फटाक्यांनाच परवानगी दिली आहे.
ग्रीन फटाके ओळखणे खूप सोपे
खरे ग्रीन फटाके ओळखणे खूप सोपे आहे. ज्या फटाक्यांवर CSIR-NEERI चा लोगो, QR कोड, "Green Crackers" असा लेबल आणि पेट्रोलियम आणि एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) चे प्रमाणपत्र असते, तेच अधिकृत ग्रीन फटाके असतात.
200 हून अधिक फॅक्टऱ्या कार्यरत
पूर्वी फटाक्यांचे उत्पादन प्रामुख्याने तामिळनाडूतील शिवकाशी येथे होत होते, पण आता महाराष्ट्रातील तेरखेडासारखी नवी केंद्रे झपाट्याने उदयास येत आहेत. तेरखेडा गावात फटाका उद्योगाची सुरुवात 1983 साली झाली आणि आज या गावात 200 हून अधिक फॅक्टऱ्या कार्यरत आहेत. इथे विविध प्रकारचे फटाके – अनार, फुलबाजी, रॉकेट, बम – तयार होतात. येथून तयार झालेले फटाके संपूर्ण महाराष्ट्रात घाऊक स्वरूपात पाठवले जातात. तेरखेडाच्या उद्योजकांनी केवळ परंपरा जपली नाही, तर ग्रीन फटाक्यांसारखे पर्यावरणपूरक बदलही स्वीकारले आहेत. हेच कारण आहे की, 'महाराष्ट्राचं शिवकाशी' ठरलेल्या तेरखेडा गावातील हा छोटासा उद्योग आज देशभरात पर्यावरणाचे रक्षण करत, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे
