Advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : व्यासपीठावर लक्ष्मणराव ढोबळे यांना मानाचे स्थान
सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून असलेले सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. आता येथे लवकरच रात्रीची विमानसेवा, कार्गो सेवा सुरू करणार आहोत. सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्याने तीर्थक्षेत्र, उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच या विमानसेवेमुळे आय टी पार्क उभारण्यासाठी आता उद्योजक येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, विमानसेवेचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने आरसीएस सारखी योजना सुरू केली. राज्य सरकारने सोलापूरसाठी या योजनेंतर्गत विमानसेवेतील तूट भरून काढण्याचे मान्य केले. आरसीएसच्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून १८ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय.जी.सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, स्टार एअरचे संजय घोडावत, एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते.
मानाच्या रांगेत विराजमान...
या सोहळ्यास माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे व्यासपीठावर मानाच्या रांगेत विराजमान झाले होते. ढोबळे यांनी भाजप पक्षाला रामराम करीत आपले राजकीय गुरु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात घरवापसी केलेली आहे. मात्र, त्यांचा राजकारणात सर्वपक्षिय संपर्क चांगला आहे. त्याचे सोलापूर जिल्ह्याच्या विकासातही मोठे योगदान आहे, यामुळे कार्यक्रम कोणताही असला तरी त्यांना नेहमीच मानाचे स्थान मिळत आले आहे.
