Advertisement
पोलीस ठाणेदाराकडून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना "दिवाळी" : प्रकरणाची चौकशी होणार
छत्रपती संभाजीनगर : बिडकीन पोलीस स्टेशनचे ठाणेदार (इन-चार्ज) निलेश शेळके यांनी चक्क आपल्या पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चांदीच्या नाण्यांचे "दिवाळी" वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, चांदीची ही नाणी नेमकी कुठून आणली आणि यासाठी पैसा कोणाचा वापरला गेला, या अनुत्तरीत प्रश्नांमुळे सहायक पोलीस निरीक्षक शेळके अडचणीत आले आहेत. संभाजीनगरच्या पोलीस अधिक्षकांनीही या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं जाहीर केल आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिडकीन पोलीस स्टेशनचे इंचार्ज निलेश शेळके यांनी दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला. त्यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना चांदीची नाणी वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
हे नाणी वाटप करताना पोलीस कर्मचाऱ्यांसोबत ठाणेदार शेळके यांचे फोटोसेशनही झाले. यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाणी वाटपामागील हेतू चांगला असला तरी, चांदीची नाणी कुठून आली, यासाठी खर्च झालेला पैसा कोणाचा होता, याबाबत स्पष्टता नसल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत.