Advertisement
11 हजार 420 कोटी रुपयांचे प्रकल्प
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे दोन्ही प्रकल्प 11 हजार 420 कोटी रुपयांचे आहेत. विशेष म्हणजे यापैकी एका प्रकल्पामुळे महाराष्ट्र शेजारच्या राज्याला रेल्वे मार्गेने जोडले जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भुसावळ ते वर्धा मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे. हा मार्ग एकूण 314 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पासाठी एकूण 9117 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये म्हणजेच 2030 पर्यंत हा मार्ग बांधून पूर्ण होणार आहे. या मार्गावर सध्या रोज अंदाजे 10 ट्रेन धावतात. आठवड्यामध्ये या मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्सची संख्या 37 ते 38 इतकी आहे. या मार्गावरील प्रवासासाठी सरासरी 4 ते 7 तास लागतात. या मार्गावरील अजनी वंदे भारत ही सर्वात जलद ट्रेन असून ती 314 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 4 तास 13 मिनिटं घेते.
भुसावळ ते वर्धा मार्गाचं विस्तारीकरण होत असतानाच एक नवा मार्गही तयार केला जाणार असून त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 2223 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्रातील गोंदियापासून दोडडगडदरम्यानचा रेल्वे मार्ग उभारला जाणार असून या माध्यमातून महाराष्ट्र आणि छत्तीसगड ही दोन राज्यं जोडली जाणार आहेत. हे काम 2030-31 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा रेल्वे मार्ग 84.10 किलोमीटरचा आहे.
या मार्गाचा काय फायदा होणार?
या नव्या मार्गामुळे गोंदिया जंक्शनवरील ट्रेन्सची वाहतूक अधिक सुरळीत होईल. दुरग जंक्शन, नागपूर आणि बल्लारशाह जंक्शनमधील मालवाहतुकीसाठी या नव्या मार्गामुळे बायपास तयार होईल. कोळसा, कंटेनर, सिमेंट, फ्लाय अॅश, धान्य, स्टील यांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. या मार्गामुळे खाणकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्रांना चालना मिळेल. हा प्रकल्प दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येतो. सध्या फायनल लोकेशन सर्वे पूर्ण झाला असून, आता निधी उपलब्ध झाल्याने या मार्गावरील काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
