Advertisement
मुंबई : राज्यामध्ये पुढील काही आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र या निवडणुकींमध्ये काही वेगळे आणि आश्चर्याचा धक्का देणारे प्रयोग पाहायला मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच एका शक्यतेनुसार साधारण अडीच वर्षांपूर्वी पक्षात फूट पडून वेगळ्या झालेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे महायुतीमधील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे बालेकिल्ले स्वबळावर लढवण्याचा तिन्ही पक्षांचा विचार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यामध्ये स्वबळाचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. असं असतानाच आता यापैकी एका ठिकाणी पवार काका-पुतण्या एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
सूचक विधानाने चर्चांना उधाण
पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी परस्पर सामंजस्याने एकत्र लढू शकतात, खरंच तसे काही चान्सेस आहेत का? असा सवाल सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी, मी आत्ताच कसं यावर बोलू? कायकर्ते काय ठरवतील त्यावर चर्चा करू मग यावर बोलू, असं उत्तर दिलं. म्हणजेच, थोडक्यात पुणे मनपात भाजप स्वबळावर लढणार असेल तर त्याला काऊंटर म्हणून दोन्ही राष्ट्रवादी आतून परस्पर सामंजस्य करून छुपी युती करून लढू शकतात ही शक्यता सुप्रिया सुळे यांनी फेटाळलेली नाही. त्यामुळेच पुण्यातील महापालिका निवडणूक अधिक रंजक होणार आहे.
