Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे ; मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ
मंगळवेढा : व्यावसायिक राजकारण करत सत्तेतून पैसा व पैसा मिळवून परत सत्ता हस्तगत करण्यासाठी राजकारण करणाऱ्यांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
मारुतीच्या पटांगणात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ सभेत ढोबळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, भगीरथ भालके, बबनराव अवताडे, प्रशांत साळे, अॅड. रविकिरण कोळेकर, मुरलीधर दत्तू, रामचंद्र वाकडे आदी उपस्थित होते.
यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा बबन अवताडे यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी संत दामाजी चौकातून पदयात्रा काढत शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक, गैबीसाहेब दर्गा, मुरलीधर चौक या मार्गे या पदयात्रेचे रूपांतर सभेत मारुती पटांगणात झाले. यावेळी बोलताना लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, मंगळवेढा शहरामध्ये टक्केवारी व ठेकेदारी ही संस्कृती गेल्या १५ वर्षांत फोफावत गेली. परंतु] सध्या वेगळ्या पद्धतीचे राजकारण सुरू असून मंगळवेढामध्ये चंगू व मंगू यांनी जो त्रास सुरू केला आहे, या दोघांना बाजूला करा.
यावेळी भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच सातत्याने स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय दिशा बदलणाऱ्या तसेच नगरपालिकेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करणाऱ्या मंडळींना कायमचे बाजूला करा, असे आवाहन केले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश साठे यांनी पक्ष बदलून मुखवटे बदलून स्वतःच्या पक्षाची एबी फॉर्म रद्दीत टाकून देणाऱ्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन केले.
तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा आवताडे यांनी बोलताना, बाटली तीच लेबल नवीन, असे सांगत मी शहराच्या हितासाठी पूर्णवेळ काम करेन, असे आश्वासित केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, युवराज घुले यांनीही मनोगत व्यक्त केले.
