Advertisement
अजितदादांचा थेट शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला फोन
पुणे : राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. त्यानंतर राज्यात लगेचच महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेमध्ये युती करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडेंना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.
प्रशांत जगताप म्हणाले, पक्षाने माझ्यावर मोठ्या विश्वासाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपावली आहे. ती मी पार पाडत आहे. 15 डिसेंबर रोजी पुणे महापलिका निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे. येत्या 18 जानेवारी रोजी महापालिकेची निवडणूक होऊ शकते, तर 19 जानेवारी 2026 रोजी निकाल लागू शकतो. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी पुणे महापालिका निवडणुकीत युती करावी म्हणून अंकुश काकडे यांना फोन केला आहे, मी या संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो की मी महायुतीमधील कोणत्याही पक्षासोबत युती करायला विरोध करण्याचे कारण की, पुण्यामध्ये महायुतीबद्दल प्रचंड असंतोष आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण महायुतीमधील घटक पक्षाशी महापालिका निवडणुसाठी युती केली तर तो चुकीचा संदेश जाईल असं जगताप यांनी आपल्या या पत्रामध्ये म्हटलं आहे.
