Advertisement
निवडणूक अधिकार्यांनी मागणी फेटाळली
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी जिल्ह्यातील 153 उमेदवारांनी भरलेल्या 157 अर्जांची छाणणी सुरू झाल्यानंतर लक्ष्मी दहिवडी गटातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा अर्ज बाद ठरविण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी मोठे प्रयत्न केले, त्यांच्या सासरी आणि माहेरील आडनावाचा मुद्दा पुढे करीत त्यांचा अर्ज बाद ठरवावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी प्रचंड गोंधळ करण्यात आला. मात्र, अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे सादर केलेली असून दोन्ही आडनावांबाबत तसेच मतदार यादीतील नोंदीबाबत खुद्द तहसीलदारांकडून पडताळणी करून घेतले आहे, त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत निवडणूक अधिकार्यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली, त्यामुळे विरोधकांच्या तोंडावर चांगलीच चपराक बसली.
माजी मंत्री प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या लक्ष्मी दहिवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवित आहेत. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्याच्या मातोश्री स्व. अनुराधा ढोबळे यांची निवड बिनविरोध होता होता राहिली, त्यांच्या विरोधात ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरून येथील समाजावर निवडणूक लादली गेली, आईची इच्छा तसेच लोकाग्रहास्तव यावेळी अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच त्यांचा अर्जच बाद व्हावा, याकरीता विरोधकांनी मोठे प्रयत्न केले. परंतु, ते अयशस्वी ठरले, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज बांधवांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्याशी संपर्क साधला असता मी माहिरवाशीण आहे, माझे लोक माझ्या बरोबर आहेत, मी कोणावरही नाराज नाही, अशी प्रांजळ प्रतिक्रिया व्यक्त केली.
