Advertisement
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र हादरला आहे. ते केवळ एक नेते नव्हते, तर प्रशासनावरील आपली जरब आणि स्पष्टवक्तेपणामुळे ते राजकारणातील एक पॉवर हाऊस मानले जात होते. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता त्यांच्या खुर्चीचा आणि राजकीय वारशाचा खरा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत चर्चा आहे.
अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या राजकीय वारशासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सुनेत्रा पवार या केवळ अजित पवार यांच्या पत्नी नाहीत, तर त्यांचा स्वतःचा एक स्वतंत्र जनसंपर्क आहे. त्या सध्या राज्यसभा खासदार आहेत आणि बारामतीमधील स्थानिक राजकारणात त्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत.
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा आणि एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या प्रमुख म्हणून त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. अजित पवार यांच्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार हा एक सर्वमान्य चेहरा ठरू शकतो.
अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार हे गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय प्रयत्न करत आहेत. त्यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना त्यात यश मिळाले नाही. पार्थ हे सातत्याने वडिलांच्या राजकीय कामात मदत करत आले आहेत. दुसऱ्या बाजूला, धाकटे चिरंजीव जय पवार हे आतापर्यंत मुख्य प्रवाहातील राजकारणापेक्षा कौटुंबिक व्यवसायात अधिक लक्ष देत होते. मात्र, बारामतीमधील स्थानिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती लक्षणीय असते.
अजित पवार यांच्या वारशाचा विचार करताना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जनता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुळे त्यांच्याकडे जाणार की सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पुत्रांना सहानुभूती मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण सांभाळण्यात अजित पवार यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात पक्षातील आमदारांची ताकद टिकवून ठेवणे, हे त्यांच्या वारसदारासमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.
