#

Advertisement

Saturday, February 21, 2026, February 21, 2026 WIB
Last Updated 2026-02-21T11:38:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आरोपींना कोण वाचवत आहे ?

Advertisement

रोहित पवार : दादांच्या विमान अपघातात ट्वीस्ट

दिल्ली : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे, असा गंभीर आरोप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणात व्यावसायिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरावर षडयंत्र असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. केंद्र सरकार, डीजीसीए (DGCA) आणि व्हीएसआर (VSR) एअरलाईन्सवर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यांच्या नव्या मांडणीमुळे अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय अजून बळावला आहे. हे सांगत असताना आरोपींना कोण वाचवत आहे, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

रोहित पवार म्हणाले की, अजित दादांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अत्यंत चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणात आता केवळ पंतप्रधान आणि गृहमंत्रीच न्याय देऊ शकतात. या संदर्भात ते पंतप्रधानांना पत्रही लिहिणार आहेत. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची भावना असल्याचे रोहित यांनी नमूद केले. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी पहिल्याच दिवशी संबंधित कंपनीला क्लीन चिट कशी दिली? असा सवाल करीत रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. 

रोहित पवार यांनी सांगितले की, या प्रकरणात प्रश्न विचारू लागताच त्यांना ट्रोल केले जात असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विमानात आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन का भरले होते?  शेवटच्या क्षणी वैमानिक का बदलला? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. व्हीएसआर कंपनी आपले व्यवहार परदेशात हलवण्याच्या तयारीत असून आजही या कंपनीची विमाने उडत आहेत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 

हा केवळ अपघात नसून राजकीय आणि व्यावसायिक हितसंबंधांतून रचलेले षडयंत्र असू शकते, अशी भीती रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. प्राथमिक अहवाल येण्यास होणारा उशीर हा संशयाला जागा देणारा असल्याचे सांगत, त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्या पक्षाचे आहेत, त्याच पक्षाच्या नेत्यांचे हितसंबंध कंपनीशी जोडलेले असल्याने तपास निष्पक्ष होऊ शकत नाही, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.