Advertisement
स्वीकृत नगरसेवकांच्या एका जागेच्या निवडीवरून विरोधी पक्षाकडून हल्लाबोल
सोलापूर : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या एका जागेच्या निवडीवरून शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या निवडीतील कथित गोपनियतेवरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे तसेच एमआयएमच्या सदस्यांनी सत्ताधारी पक्षाकडे थेट जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली; मात्र सभागृह नेते आणि सत्ताधारी पक्षाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने वातावरण अधिकच तापले. सभागृहात घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळ वाढत गेल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता महापौर विनायक कोंड्याल यांना अखेर सभा तहकूब करण्याची नामुष्की पत्करावी लागली.
स्वीकृत सदस्य निवडीसाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेत स्वीकृत 10, स्थायी समिती 16 आणि परिवहनच्या 12 सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार होत्या. सर्व नगरसेवकांची पहिलीच सभा होती. सभेची नियोजित वेळ 11 असताना तब्बल अर्धातास सभा उशिरा चालू झाली. 11 वाजून 48 वाजता महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे आगमन झाले. सभा सुरू होताच सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी नगरसचिव यांना विषय पत्रिकेवर चार विषय असताना प्रधान्यक्रम वाचण्यास सांगितले. याला शिवसेना गटनेते अमोल शिंदे, काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी अक्षेप घेतला. नवा कमी विषय असताना प्रधान्यक्रम कशाला अशी विचारणा केली. येथेच वादाची पहिली ठिणगी पडली. त्यावेळी सभागृह नेते काळे आणि शिंदे नरोटे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया घेण्यात आली.
